हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी भावनिक पोस्ट केली आहे. बाळासाहेब व मासाहेब आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, आज साहेबांचा जन्मदिवस. साहेबांची आठवण नाही असा एकही दिवस जात नाही. त्यांचे माझ्या जीवनातील स्थान अढळ आहे. साहेबांच्या पुण्यस्मरणासाठी मी माझे आत्मचरित्र ‘झंझावात’ मधील एक उतारा उद्धृत करतो.
“साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत आहे. साहेब आणि माँसाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते. साहेबांच्या निधनाने माझ्या मनातला एक कोपरा निष्प्राण झाला. आजही मला विचाराल की, या जगातली माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे, तर मी बेधडकपणे ‘बाळासाहेब ठाकरे’ हेच एक नाव घेईन. ते माझ्यासाठी माझं जग होते आणि राहतीलही. माझ्या आयुष्यात कितीही चढउतार येऊ देत, मी आज जो कोणी आहे, त्यामागे त्यांचाच आशिर्वाद आहे हे मी आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही” अशी प्रतिक्रिया खा. नारायण राणे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
