कसाल पुलावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ आक्रमक

आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुल परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असून, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ओसरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

या गंभीर प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असून, निवेदनानंतरही आठ दिवसांच्या आत पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास कसाल पुल येथे मुंबई-गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ओसरगाव शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून, या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने प्रवास करतात. मात्र कसाल पुल परिसरात पावसाळ्यात वारंवार मोठे खड्डे पडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत असून, वाहतूकही संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी ओसरगाव शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कसाल पुल परिसरातील खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रदीप तळेकर, गजानन तळेकर, प्रमोद कावळे, मुकुंद धुरी, वायंगणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी पुलावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा लोकशक्तीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

error: Content is protected !!