
उपचारासाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित
भजनप्रेमींसह समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन
कणकवली : आपल्या मधुर आवाजाने, भक्तिमय भजनाने आणि कलेच्या माध्यमातून अनेक वर्षे भजन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे समीर रामा कदम (भजनी बुवा), रा. पोखरण सध्या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च अपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचणीचे संकट उभे राहिले आहे.
डॉक्टरांच्या उपचारानुसार पुढील उपचारांसाठी अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम त्यांच्या कुटुंबासाठी मोठी असून, या कठीण प्रसंगी त्यांना समाजातील दानशूर व्यक्ती, भजन रसिक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच सेवाभावी नागरिकांच्या मदतीची गरज आहे.
बुवा समीर कदम यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्षे भजन रसिकांच्या मनात भक्तीची ज्योत तेवत ठेवली. त्यांच्या मधुर आवाजातून आणि भक्तिमय भजनातून अनेकांना आध्यात्मिक आनंद मिळाला. आज त्यांच्यावर उपचाराची वेळ आली असून, भजनप्रेमी आणि समाजाने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“एक हात मदतीचा… एका जीवाला जगण्याची संधी देणार!” या भावनेतून समीर कदम यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येकाची छोटीशी मदतही त्यांच्या उपचारासाठी मोठा आधार ठरू शकते.
समीर कदम यांच्या उपचारासाठी मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या UPI/QR बुवा समीर कदम यांचा दिलेला असुन सदर रक्कम त्यांच्याच खात्यात कोडद्वारे आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या उपचारासाठी सढळ हस्ते मदत करून या कठीण प्रसंगी कदम कुटुंबीयांना आधार द्यावा, अशी भावनिक विनंती करण्यात आली आहे.
“आपली मदत – त्यांचे जीवन! माणुसकी जपूया… एक जीव वाचवूया!” असा संदेश देत जास्तीत जास्त नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Subscribe









