पिंगुळी सोसायटीचा ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ सहा शेतकऱ्यांना

६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महसुली गावनिहाय शेतकऱ्यांचा गौरव

केतन शिरोडकर /पिंगुळी

पिंगुळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२६’ यंदा महसुली गावनिहाय शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आला. प्रत्येक महसुली गावातून एका शेतकऱ्याची निवड करून त्यांच्या शेतीतील योगदानाचा गौरव करण्यात आला.

सोसायटीच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शेती क्षेत्रात सातत्याने मेहनत, विविध शेतीविषयक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतीविषयक योगदानाची दखल घेत महसुली गावनिहाय निवड झालेल्या सहाही शेतकऱ्यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन गौरव करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये मधुकर राजाराम धुरी (टेंबधुरीनगर), प्रकाश शिवराम सडवेलकर (गुढीपूर-शेटकरवाडी), न्हानू हरी पिंगुळकर (देऊळवाडी-आंबेडकरनगर), वासुदेव विश्वनाथ पाटकर (गोंधळपूर-भूपकरवाडी), यशवंत वासुदेव बिर्जे (बिबवणे) आणि महेश सुरेश पिंगुळकर (पिंगुळी-सराफदारवाडी) यांचा समावेश आहे.

‘कष्टाचे पचे उन्न अन्न, या मातीचा वारा;
कधी बरसत असो पावसाच्या ओल्या धारा.
माझा बळीराजा शेतात दिवसभर राबतो;
त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हेच एक मागणे मागतो.’

या भावनेला साजेसे कार्य करणाऱ्या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. पारंपरिक शेतीसोबत आधुनिक पद्धतींचा अवलंब, मेहनत, सातत्य आणि शेतीविषयीची निष्ठा यामुळे या शेतकऱ्यांनी परिसरातील इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सोसायटीने महसुली गावनिहाय पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन दिले.

पुरस्कार वितरणावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर, सोसायटीचे अध्यक्ष विजय दळवी, उपाध्यक्ष वामन राऊळ, संचालक राजन पांचाळ, प्रसाद दळवी, खानोलकर, गायचोर, बिर्जे मॅडम, सचिव संतोष गावडे, वरिष्ठ लिपिक धुरी मॅडम, बाबली पिंगुळकर आणि द्रौपदी धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शेतकरी प्रकाश पिंगुळकर, अभिलाष मेस्त्री, आगलावे व शेतकरी वर्ग यांच्यासह सोसायटीचे संचालक मंडळ, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महसुली गावनिहाय सहा शेतकऱ्यांचा करण्यात आलेला हा सन्मान शेती क्षेत्रासाठी निश्चितच प्रोत्साहन देणारा ठरला आहे. या पुरस्कारामुळे शेतीमध्ये मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळणार असून, नव्या पिढीनेही आधुनिक व प्रयोगशील शेतीकडे वळावे, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

दरम्यान, आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या सर्व सहा शेतकऱ्यांचे पिंगुळी परिसरात शेतकरी वर्गातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!