कुडाळ आगारातील बंद ठेवण्यात आलेल्या ५७ एस.टी. बसफेऱ्या अखेर पूर्ववत

प्रवाशांना मोठा दिलासा

कुडाळ : कुडाळ आगारातून चालणाऱ्या ग्रामीण व प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ५७ एस.टी. बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर प्रश्नासंदर्भात आज दुपारी ठीक ३.०० वाजता कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस विद्यमान सभापती मिलिंद नाईक, आमदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घाडी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या कुडाळ आगार अध्यक्षा रश्मी नाईक तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय सरचिटणीस रोशन तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान बंद ठेवण्यात आलेल्या ५७ बसफेऱ्यांबाबत आगार व्यवस्थापक यांना जाब विचारण्यात आला तसेच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, कामगार व सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या सर्व फेऱ्या तात्काळ सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली.

या चर्चेची दखल घेऊन संबंधित ५७ बसफेऱ्या तात्काळ पूर्ववत करण्याबाबत आवश्यक आदेश काढण्यात आले असून, आज दिनांक ९ सप्टेंबर २०२६ पासून सर्व फेऱ्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांच्या हक्कासाठी, ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय कर्मचारी सेना सदैव तत्पर व कटिबद्ध राहील असे सांगण्यात आले.

error: Content is protected !!