तो अपघात नव्हे तर खून

५ वर्षांपूर्वी फोंडाघाट येथील दरीत कोसळून झाला होता युवकाचा मृत्यू

आर्थिक देवाण घेवाणीतून झाला होता वाद

कुडाळ येथे बोलावून केलेल्या जबर मारहाणीत झाला होता मृत्यू

कणकवली : फोंडाघाट येथे दरीत कोसळून अश्पाक मुलाणी उर्फ निहाल या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. मात्र, हा अपघाती मृत्यू नसून त्याचा चार जणांनी मिळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील घाटकोपर क्राईम ब्रँचच्या टिमने या प्रकरणाचा छडा लावला आहे. घाटकोपर पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कणकवली पोलिसांचे पथक चारही जणांना ताब्यात घेऊन कणकवलीच्या दिशेने निघाले आहे.

अशपाक मुलाणी उर्फ निहाल (रा. सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर, अतिष भगवान मोरे, ऋतूराज शेट्टी हे खून प्रकारणातील आरोपी आहेत. चारही आरोपी मुंबई परिसरात राहणारे आहेत, अशी माहिती घाटकोपर क्राईम बॅचच्या पथकाने दिली आहे.

घटना अशी, पाच वर्षांपूर्वी अशपाक मुलाणी याचा मृतदेह फोंडाघाट येथे दरीत आढळला होता. बाजूलाच दुचाकी देखील असल्याने अशपाक दुचाकीस घाटात कोसळला असावा, अशा निष्कर्षापर्यंत कणकवली पोलीस पोहोचले होते. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंदही झाली होती.

मात्र, तब्बल पाच वर्षानंतर या घटनेला वेगळेच वळण प्राप्त झाले. अशपाक याला मारणाऱ्या संशयितांपैकी एकजण दारूच्या नशेत या खूनाविषयी बरळला अन् ही बाब घाटकोपर क्राईम ब्रँचपर्यंत पोहोचली. घाटकोपर क्राईम ब्रँचच्या टिमने बुधवारी सकाळच्या सुमारास चारही संशयितांना बोलावून घेतले. खाकीचा हिसका दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अशपाक व वरील संशयित यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीतून वाद होते. याच वादातून संशयितांनी अशपाक याला कुडाळ येथे एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. पुढे संशयितांनी त्याला कुडाळ येथेच जबर मारहाण केली. त्यात अशपाक याचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी अशपाक याचा मृतदेह व त्याच्या ताब्यातील दुचाकी फोंडाघाट येथे दरीत टाकली व तेथून पसार झाले, अशी माहिती घाटकोपर क्राईम ब्रँचच्या तपासात प्राप्त झाली.

याबाबत घाटकोपर पोलिसांनी कणकवली पोलिसांना कळवले. त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर येथे पोहोचले. हे पथक घाटकोपर येथून कणकवलीला येण्यास निघाले आहे. आता संशयितांनी अशपाक याला नेमके कसे ठार केले, हे पुढील तपासामध्ये स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!