वेंगुर्ला येथील मोटारसायकल चोरी प्रकरणातील चोरटा ताब्यात

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथून दुचाकीचोरी प्रकरणातील चोरट्याला गोवा येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. सिद्धार्थ संदेश गावडे (१९) असे संबंधित चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर वेंगुर्ला पोलीस ठाण्यामध्ये गुर.नं. 108/2026, भा.न्या.सं. कलम 303(2), व गु.र.नं. 89/2026 भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्ड वरील आरोपी सिद्धार्थ संदेश गावडे (रा.व्हिजन हॉस्पिटल जवळ, म्हापसा – गोवा) याला ओल्ड गोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोकोचीन हॉटेल परिसरातून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हे कबूल केले. संबंधित चोरट्याविरुद्ध गोवा राज्य, बांदा पोलीस ठाणे, कुडाळ पोलीस ठाणे येथे यापूर्वी देखील घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.कु.नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार जँक्शन घोन्सालवीस, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिस्कर यांच्या पथकाने केलेली आहे.

error: Content is protected !!