तारकर्ली समुद्रकिनारी अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळला

पोलिसांकडून ओळखीसाठी आवाहन

मालवण : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या तारकर्ली येथील निशाणकाठी समुद्रकिनारी बुधवारी दुपारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ सत्यवान भगत यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने मालवण पोलिसांना याविषयी माहिती दिली. यानंतर पोलीस पाटील रंजन कोळंबकर यांनीही घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांत अधिकृत नोंद केली. भरवस्तीजवळील किनाऱ्यावर अचानक मृतदेह आढळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता मृतदेह उताण्या स्थितीत आढळून आला. समुद्राच्या पाण्यात बराच काळ राहिल्यामुळे हा मृतदेह अत्यंत सडलेल्या व कुजलेल्या अवस्थेत आहे, ज्यामुळे चेहरा ओळखणे कठीण झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार मृत व्यक्तीचे वय ४० ते ५० वर्षांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. मृत व्यक्तीच्या अंगात ‘साई संस्कृती फाउंडेशन, दहिसर पूर्व, मुंबई’ असे नाव छापलेला हिरवट रंगाचा पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पँट आहे. तसेच कमरेला लाल-काळा दोरा, दोन्ही पायांत काळे धागे आणि उजव्या हातावर राखी बांधलेली दिसून आली आहे.

दरम्यान, हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, तो पाण्यात कसा बुडाला किंवा ही घातपाताची घटना आहे का, या दिशेने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्रभारी पोलीस अधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. टी-शर्टवरील मुंबईच्या पत्त्याच्या आधारे मुंबई व परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात असून, या वर्णनाची कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास मालवण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!