१७ वर्षीय तरुणाची हत्या
मृतदेह तिलारीच्या दरीत फेकला; तिघे ताब्यात
दोडामार्ग : सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीशी झालेली मैत्री एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील १७ वर्षीय हर्षद प्रकाश हुंदळेकर याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह तिलारीनगर नजीकच्या स्वप्नवेल येथील खोल दरीत फेकून देण्यात आला. या थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून चंदगड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपास चक्रे फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्वे येथील महाविद्यालयात बारावीत शिकणारा हर्षद शनिवारच्या रात्री अचानक बेपत्ता झाला होता. तो गावातील मित्र अजय साळुंखे याच्यासोबत दुचाकीवरून पाटणे फाट्याकडे जाण्याच्या बहाण्याने निघाला. मात्र, पुढे ते तिलारीनगरच्या दिशेने गेले. मोटणवाडी येथील पेट्रोल पंपावर थांबले असताना हर्षद मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका मुलीने भेटायला बोलावल्याचे सांगून, हर्षद मित्राला पंपावरच थांबवून पार्ले गावाच्या दिशेने गेला. अर्ध्या तासात येतो असे सांगून गेलेला हर्षद मध्यरात्र उलटली तरी परतला नाही आणि त्याचा फोनही बंद लागल्याने मित्राला संशय आला.
हर्षद घरी न परतल्याने आणि त्याचा संपर्क तुटल्यामुळे कुटुंबीय व मित्रांनी मोटणवाडी, पार्ले आणि कळसगादे परिसरात रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर कसून शोध घेतला. मात्र त्याचा कोणताच थांगपत्ता लागला नाही. सात वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपलेल्या हर्षदच्या मागे आई, लहान भाऊ आणि वृद्ध आजी-आजोबा असा परिवार आहे. हर्षद अचानक गायब झाल्याने हवालदिल झालेल्या त्याच्या आई योगिता हुंदळेकर यांनी चंदगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलाच्या अपहरणाची फिर्याद नोंदवली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. तपासादरम्यान हर्षदचा खून करून त्याचा मृतदेह तिलारी परिसरातील स्वप्नवेल दरीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे बुधवारी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रयत्नांसोबतच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वेगाने हालचाली करत या गुन्ह्याशी संबंधित तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
इन्स्टाग्रामवरील ते बनावट अकाऊंट कोणाचे होते, हर्षदला सापळ्यात अडकवून बोलावणारा नेमका कोण होता आणि या हत्येमागील खरा हेतू काय होता, या दिशेने आता पोलीस सखोल तपास करत आहेत. सोशल मीडियावरील आभासी ओळख आणि अनोळखी व्यक्तींवर ठेवलेला आंधळा विश्वास किती जीवघेणा ठरू शकतो, हे या भीषण घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले असून पालकांमध्ये आणि तरुणाईमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.


Subscribe










