सकाळी ११:३० वाजल्यापासून बंद असलेल्या एसटी बसेस अखेर सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा
कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा आज सकाळी ११:३० वाजल्यापासून कोलमडल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. ग्रामीण भागासह विविध मार्गांवर प्रवास करणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवासी बसस्थानकांवर ताटकळत थांबले होते.
अचानक बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अनेक प्रवाशांची नियोजित कामे खोळंबली, तर ग्रामीण भागातील नागरिकांना पर्यायी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला.
प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात येताच शिवसेनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसटी प्रशासनाला जाब विचारला. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.त्यावेळी शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, गटनेते विलास कुडाळकर, राजवीर पाटील आदी उपस्थित होते
अखेर शिवसेनेच्या दणक्यानंतर एसटी प्रशासनाने तातडीने हालचाली करत कुडाळ तालुक्यातील बससेवा पूर्ववत सुरू केली. बससेवा सुरू झाल्यामुळे अनेक तासांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्रवाशांच्या प्रश्नासाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आणि प्रशासनाला तत्काळ निर्णय घेण्यास भाग पाडले.



Subscribe










