अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरातून बसस्थानकांची स्वच्छता; एसटी बसेसही होत आहेत चकाचक
सिंधुदुर्ग : कोकणातील सर्वात मोठ्या आणि उत्साहाच्या सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके सज्ज होत आहेत.
माननीय परिवहन मंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या स्वच्छता व्यवस्थेमध्ये विशेष लक्ष दिले जात असून, अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्रीचा वापर करून बसस्थानके अधिक स्वच्छ आणि आकर्षक करण्यात येत आहेत.
बसस्थानक परिसरातील दैनंदिन स्वच्छता, ओल्या व कोरड्या पद्धतीने साफसफाई, शौचालयांची नियमित स्वच्छता, प्लॅटफॉर्म परिसराची देखभाल तसेच प्रवाशांच्या प्रतीक्षालयांची स्वच्छता यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर एसटी बसेसचीही नियमित स्वच्छता करण्यात येत असून, प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला स्वच्छ आणि आनंददायी वातावरण मिळावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
“स्वच्छ बसस्थानक, स्वच्छ एसटी आणि समाधानी प्रवासी” या उद्देशाने सिंधुदुर्गातील विविध बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
गणरायाच्या आगमनाच्या उत्साहात आपल्या गावाकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत आता स्वच्छ, सुंदर आणि चकाचक बसस्थानकांमधून करण्यासाठी सिंधुदुर्गातील एसटी प्रशासन आणि स्वच्छता कर्मचारी सज्ज झाले आहेत.
गणपती बाप्पा मोरया! स्वच्छ प्रवासाचा संकल्प, चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी सदैव तत्पर!




Subscribe










