कुडाळ : विद्यार्थ्यांच्या बससेवेतील दिरंगाईवर युवासेनेचा दणका!

कुडाळ एसटी आगाराच्या ओरोस –डॉन बॉस्को–पिंगूळी विद्यार्थ्यांसाठीच्या बसफेरीतील अनियमिततेबाबत आज पालकांसह युवासेनेने कुडाळ एसटी आगारावर धडक देत आगार व्यवस्थापकांना जाब विचारला.

या बसफेरीत विद्यार्थ्यांना सातत्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या. बस वेळेवर न येणे, उशिरा पोहोचणे, विद्यार्थ्यांना पालकांना कोणतीही कल्पना न देता वाटेत उतरवणे, अर्ध्या रस्त्यात सोडणे, दुसऱ्या बसमध्ये चढवणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसमध्ये पॅसेंजर घेऊन विद्यार्थ्यांना उभे ठेवणे अशा गंभीर प्रकारांमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

आज नेहमीप्रमाणे शाळा दुपारी १.०० वाजता सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध न झाल्याने संतप्त पालकांनी युवासेनेशी संपर्क साधला. त्यानंतर युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर, युवतीसेना तालुका प्रमुख गायत्री गोलम, तालुका सचिव साईराज दळवी, कुमार राठोड तसेच इतर पदाधिकारी पालकांसह कुडाळ एसटी आगारात दाखल झाले.

यावेळी आगार व्यवस्थापकांसमोर पालकांच्या तक्रारींचा पाढा वाचत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि त्यांच्या वेळेशी खेळण्याचा प्रकार तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली. सुरुवातीला समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने युवासेना पदाधिकारी आक्रमक झाले.

त्यानंतर आगार व्यवस्थापकांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, बसफेरी नियमित ठेवण्याबाबत तसेच भविष्यात अशा प्रकारची दिरंगाई होणार नाही व सदर चालक व वाहक यांच्यावर कारवाई करण्यात येईल याबाबत लेखी पत्र पालकांना/पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या बसफेरीचा दररोज जवळपास ९० विद्यार्थी लाभ घेत असून, सातत्याने होत असलेल्या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व दैनंदिन वेळापत्रक प्रभावित होत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर युवासेनेने आक्रमक भूमिका घेत आज या समस्येला वाचा फोडत एसटी प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्यास भाग पाडले.

विद्यार्थी आणि पालकांच्या या प्रश्नासाठी युवासेनेने घेतलेल्या भूमिकेबद्दल समस्त पालक व विद्यार्थ्यांनी शिवसेना पक्षाचे आमदार मा. निलेशजी राणे तसेच युवासेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!