आमदार निलेश राणेंचा थेट पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप
२ दिवसांत करणार मोठा गौप्यस्फोट
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अत्यंत खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली असून, शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी थेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) श्री. दहीकर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून थेट जाहीर आव्हान देत, सिंधुदुर्गातील सर्व अनधिकृत धंदे आणि त्या बेकायदेशीर धंद्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक दहीकर पाठींबा देत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. हा सर्व प्रकार आता मला जनतेसमोर आणावाच लागणार आहे, असा थेट इशारा देत त्यांनी पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणून सोडले आहेत.
सत्ताधारी पक्षाच्याच प्रमुख नेत्याने थेट जिल्हा पोलीस प्रमुखांवरच बेकायदेशीर धंद्यांना अभय दिल्याचा आरोप केल्यामुळे संपूर्ण गृहखात्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत येत्या दोन दिवसांत आपण जाहीर पत्रकार परिषद घेणार असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले असून, या पत्रकार परिषदेत ते कोणते पुरावे समोर आणणार आणि कोणता मोठा बॉम्ब फोडणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



Subscribe










