नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून कुडाळ शहरातील विकासकामांची पाहणी

कुडाळ : कुडाळ शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करीत आढावा घेतला. यामध्ये भंगसाळ नदीकिनारील गणेश घाट बांधकाम, सांगिर्डेवाडी येथील नमो उद्यान प्रकल्पाची पाहणी केली. त्यासोबतच भंगसाळ नदीतील गाळ उपसा कामाचीही संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. शहरातील सुरू असलेली विकासकामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, शहरात नगरपंचायत प्रशासनामार्फत मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यात शहरातील गटार व नालेसफाईची कामे अंतिम टप्प्यात असून, चार दिवसात ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहीती नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.

नगरपंचायतीमार्फत येथील भंगसाळ नदीकाठी सुसज्ज अशा गणेश घाटाचे बांधकाम सुरू आहे. तर सांगिर्डेवाडी येथे नमो उद्यान प्रकल्प साकारला जात आहे. या कामांना नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी भेट देऊन कामांचा आढावा घेतला. शहरात सुरू असलेली विकासकामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित प्रशासकीय अधिका-यांसह संबंधित ठेकेदार प्रशासनाला दिल्या. भंगसाळ नदीतील गाळ काढण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून येथील भंगसाळ बंधा-या नजिक सुरू आहे. या कामाचीही नगराध्यक्षांनी पाहणी करून, आवश्यक त्या सूचना दिल्या. गाळ उपसा केल्याने पावसाळ्यात पुराची समस्या दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेविका नयना मांजरेकर, नगर अभियंता सोनाली हळदणकर, सहाय्यक अभियंता संकेत गावडे, ठेकेदार व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!