बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा दुर्दैवी मृत्यू

नेरूर तालुक्यातील घटना

परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या भीषण हल्ल्यामुळे स्थानिक शेतकरी मोहन लवू जोशी यांचे तब्बल ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ऐन शेतीच्या हंगामात हे संकट ओढवल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे.

सध्या पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लवकरच शेतीच्या पूर्वमशागतीच्या आणि पेरणीच्या कामांना सुरुवात होणार आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या वेळी शेतीसाठी आवश्यक असलेल्या मुख्य आधाराचा, म्हणजेच बैलाचा मृत्यू झाल्यामुळे जोशी यांच्यासमोर शेतीची कामे कशी पूर्ण करायची, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एका बाजूला अचानक झालेले आर्थिक नुकसान आणि दुसऱ्या बाजूला शेतीच्या कामांची अडचण, अशा दुहेरी संकटात हे शेतकरी कुटुंब सापडले आहे.

नेरूरमधील ठाकूरवाडीत केवळ जोशीच नव्हे, तर इतर अनेक शेतकऱ्यांचीही पाळीव जनावरे आहेत. बिबट्याने थेट वस्तीजवळ येऊन हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे किंवा शेतात जाणे धोक्याचे बनले असून, आपली गुरे-वासरे कशी सुरक्षित ठेवायची, या चिंतेत सध्या स्थानिक ग्रामस्थ आहेत.या घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वनविभागाचे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करून शेतकरी मोहन जोशी यांना लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई मिळेल अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात त्वरित पिंजरा लावण्यात यावा किंवा गस्त वाढवण्यात यावी अशी स्थानिक मागणी करत आहेत. वाडीतील इतर जनावरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते मार्गदर्शन आणि उपाययोजना करण्याच्या मागणी जोर धरत आहेत.बिबट्याच्या या वाढत्या वावरामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, वनविभागाने आता वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत, अशी तीव्र मागणी नेरूर ग्रामस्थांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!