नगरसेविका चांदणी कांबळी आणि चंदन कांबळी यांच्या पाठपुराव्याला स्थानिक आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून यश
कुडाळ : लोकशाहीत इच्छाशक्ती आणि सातत्य असेल तर दशकानुदशकांचे प्रश्न सुटू शकतात, याचा प्रत्यय कुडाळकरांना आला आहे. कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील लक्ष्मीवाडी-मडवळवाडी, वैद्यवाडा येथे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र स्थानिक आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या भक्कम पाठबळामुळे आणि नगरसेविका कु. चांदणी शरद कांबळी व त्यांचे बंधू श्री. चंदन शरद कांबळी यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे तसेच वैद्य परिवार यांच्या सहकार्याने हा रस्ता अखेर पूर्ण झाला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मडवळवाडी ग्रामस्थांनी आनंद साजरा करत लोकप्रतिनिधींचे जाहीर आभार मानले आहेत.
४० वर्षांचा वनवास संपला मडवळवाडी येथील ग्रामस्थांसाठी हा रस्ता केवळ दळणवळणाचे साधन नसून जीवनवाहिनी आहे. गेल्या चार दशकांपासून ग्रामस्थ या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे मागणी करत होते. पावसाळ्यात चिखलातून वाट काढताना शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्धांचे तसेच रुग्णांचे प्रचंड हाल होत असत. अनेक आश्वासने मिळाली, पण कामाला गती मिळत नव्हती. प्रभाग क्रमांक ३ च्या लोकप्रतिनिधी म्हणून चांदणी कांबळी यांनी हा प्रश्न आपली प्राथमिकता मानली.
बहीण-भावाचा जिद्दी पाठपुरावा
नगरसेविका चांदणी कांबळी यांनी या प्रश्नाचे गांभीर्य स्थानिक आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. आमदारांनीही तातडीने दखल घेत निधी उपलब्ध करून दिला. निधी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी त्यांचे बंधू चंदन कांबळी यांनी सतत देखरेख ठेवली. बहीण-भावाच्या या जोडीने प्रशासकीय पातळीवर आणि प्रत्यक्ष जमिनीवर केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज ४० वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहे.
ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता
“आमच्या वाडीसाठी हा रस्ता म्हणजे एक स्वप्न होतं, जे आज प्रत्यक्षात उतरलं आहे. चांदणी ताई आणि चंदन दादा यांनी दाखवलेली तत्परता वाखणण्याजोगी आहे,” अशी भावना मडवळवाडीतील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. कामाच्या पूर्ततेनंतर ग्रामस्थांनी आमदारांचे मार्गदर्शन आणि कांबळी कुटुंबियांच्या विशेष प्रयत्नांबद्दल मनापासून आभार मानले आहेत.
या रस्त्यामुळे आता मडवळवाडीचा मुख्य शहराशी संपर्क अधिक सुलभ झाला असून, विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. ‘दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व’ अशी नवी ओळख आता या परिसरात निर्माण झाली आहे.


Subscribe










