बीएसएनएल टॉवरच्या वादातून आडेली येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरी…

वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आडेली येथील जीवन कुडाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल

वेंगुर्ले : प्रतिनिधी

बीएसएनएल टॉवर उभारण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून आडेली-खुटवळवाडी येथे एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) रात्री घडली. या प्रकरणी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात पोलिसांनी जीवन कुडाळकर याच्या विरोधात जबरी चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जयश्री जयदेव गडेकर (वय ५६, रा. आडेली-खुटवळवाडी, ता. वेंगुर्ला) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार जीवन रुक्मांगद कुडाळकर (वय ४२, रा. आडेली, कुडाळकरवाडी, ता. वेंगुर्ला) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३०९(४), १२६(२), ११५(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री गडेकर व जीवन कुडाळकर यांच्या मध्ये बीएसएनएल टॉवर बसविण्यासाठी जागा दिल्याच्या कारणावरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. या रागातून जीवन कुडाळकर रात्री गडेकर यांच्या राहत्या ठिकाणी बेकायदेशीर रित्या गेले आणि रागाने वरील कारणावरून शिवीगाळ केली. तसेच यावेळी गडेकर यांच्या मुलाबरोबर त्यांनी झटापट केली. हा वाद सोडविण्यासाठी जयश्री गडेकर गेल्या असता कुडाळकर यांनी त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून तेथून पळ काढला. असे गडेकर यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे.
या तक्रारीवरून वेंगुर्ला पोलिसांनी आज ५ ऑगस्ट रोजी पहाटे गुन्हा दाखल करून सकाळी आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.

error: Content is protected !!