पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
बांदा : बांदा येथील काळसेवाडी परिसरात मंगळवारी सकाळी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून १७ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. असगर सब्रतू अली (रा. बिहार) असे मृत युवकाचे नाव असून ही घटना सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचे नेमके कारण अजून समोर आले नसल्याने बांदा पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, बांदा येथील स्मशानभूमीनजीक पुरुषोत्तम दळवी यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. राजस्थान येथील ठेकेदार फुलाराम कुमावत यांच्या नियंत्रणाखाली हे काम चालत असून, असगर अली हा अवघ्या १० ते १२ दिवसांपूर्वीच त्याच्या नातेवाईकासोबत येथे मजुरीच्या कामासाठी आला होता. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर इतर कामगारांसोबत त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मंगळवारी सकाळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून असगर अचानक खाली कोसळल्याची घटना घडली. कंत्राटदाराने या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा पूर्ण केला. त्यानंतर मृतदेह सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
विशेष म्हणजे, इमारतीच्या गॅलरीला पॅरापेट वॉल (संरक्षक भिंत) असतानाही असगर खाली कसा पडला, याबद्दल परिसरात निरनिराळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मयत असगरचा आगामी ७ ऑगस्ट रोजी १८ वा वाढदिवस होता, मात्र त्याआधीच ही दुर्दैवी दुर्घटना घडली. हा निव्वळ अपघात आहे की यामागे काही वेगळे कारण, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.


Subscribe










