कुडाळ तालुक्यातील हुमरस गावातील घटना
कुडाळ : हुमरस हेळ्याचे गाळू परिसरात एका ५८ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या घरात आढळून आला. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. महेंद्र अच्युत फडके (५८) असे त्याचे नाव असून ते मूळचे प्रभातनगर, जामखंडी, जि. बागलकोट (कर्नाटक) येथील रहिवासी आहेत. याबाबतची खबर श्रीपाद रामचंद्र सादले (४०, रा. हुमरस) यांनी दिली. महेंद्र फडके गेल्या दोन महिन्यांपासून हुमरस हेळ्याचे गाळू परिसरात कीर्ती हडप यांच्या घरी राहत होते. १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट या कालावधीत त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पुढील तपास पोलिस हवालदार श्री. पाटील करत आहेत. श्री. फडके यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महेंद्र फडके हे राहत असलेले घर आतून बंद होते. या घरातून शेजारील लोकांना वास येत होता. यानंतर शेजारच्या लोकांनी त्यांच्या कर्नाटक येथील नातेवाईकांना बोलवून घेतले व यानंतर कुडाळ पोलीसांना याबाबत माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


Subscribe










