सावंतवाडी: प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोली येथील महादेव गड पॉईंटवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निपाणी येथील पर्यटक सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त पर्यटकाचे नाव डॉ. आयुब सय्यद (रा. निपाणी) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले असून ते पेशाने डॉक्टर आहेत. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घटना घडल्यानंतर सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम (आंबोली-सांगेली) कडून तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, दरीची प्रचंड खोली, त्यातच परिसरात पडणारा मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. सुरक्षेचा विचार करता बचावकार्य तात्पुरते थांबवण्यात आले असून, उद्या बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा पूर्ण क्षमतेने शोधमोहीम राबवण्यात येणार असल्याचे आंबोली पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Subscribe










