कुडाळच्या देवेंद्र सावंत याचे आकस्मिक निधन
कुडाळ : उच्च शिक्षण पूर्ण करून मुंबईत आपलं भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून गेलेल्या कुडाळ-श्रीरामवाडी येथील देवेंद्र दशरथ सावंत (वय २८) या तरुणाचे अचानक निधन झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही घटना घडल्यामुळे सावंत कुटुंबासह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. देवेंद्रच्या या अकाली जाण्याने एका कष्टाळू तरुणाचा जीवनप्रवास तडकाफडकी थांबला आहे.
देवेंद्रने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी गोवा आणि कोल्हापूर येथे काही काळ खासगी नोकरी केली होती. याशिवाय त्याने कुडाळमध्ये होलसेल कोल्ड्रिंक्स विक्रीचा व्यवसायही करून पाहिला होता. दरम्यान, मुंबईतील एका नामांकित खासगी कंपनीत त्याने दिलेली नोकरीची मुलाखत तो यशस्वीपणे उत्तीर्ण झाला होता. येत्या ३ ऑगस्ट रोजी त्याला कंपनीत कामावर रुजू होण्याचे पत्र मिळाले होते, ज्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
कामावर हजर होण्यासाठी देवेंद्र २६ जुलै रोजी कुडाळवरून डोंबिवलीच्या दिशेने निघाला होता. २७ जुलैच्या सकाळी तो डोंबिवली येथील आपल्या चुलत भावाच्या खोलीवर सुरक्षित पोहोचला. प्रवासानंतर आंघोळ करून तो विश्रांतीसाठी झोपला होता. दरम्यान त्याला उलटीचा त्रास झाला, मात्र प्रवासाचा शीण असावा असे वाटल्याने तो पुन्हा झोपला. दुपारी १२ च्या सुमारास जेवणासाठी हाक मारली असता तो बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वैद्यकीय तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अत्यंत कष्टाळू आणि जिद्दी स्वभाव असलेल्या देवेंद्रच्या निधनाने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका-काकी आणि चुलत भावंडे असा मोठा परिवार आहे. देवेंद्र हा जिल्हा परिषद कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी दशरथ सावंत यांचा मुलगा, तर ‘त्रिमूर्ती बेकरी’चे संचालक दिलीप सावंत, राजाराम सावंत आणि गणेश सावंत यांचा पुतण्या होत. त्याच्या या अकस्मात एक्झिटमुळे श्रीरामवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.


Subscribe










