पोहण्यासाठी गेला असता भंगसाळ नदीत बुडाला
कुडाळ : शहरातील कविलकाटे परिसरातून वाहणाऱ्या भंगसाळ नदीत युवक बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. वैभव नितीन बांदेकर (वय २२, रा. बाजारपेठ, कुडाळ) असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव बांदेकर हा आपल्या चार मित्रांसह दुपारनंतर पोहण्यासाठी भंगसाळ नदीकाठी गेला होता. सुरुवातीला सर्वजण नदीत उतरून पोहत होते. मात्र, काही वेळातच अचानक पाण्याची पातळी वाढू लागल्याने परिस्थिती धोकादायक बनली. नदीतील प्रवाह अचानक वेगवान झाल्याने सर्वजण घाबरले.
या परिस्थितीत वैभवचे तीन मित्र कसाबसा प्रयत्न करून नदीबाहेर सुरक्षितपणे आले. परंतु, वैभव बांदेकर हा वाढत्या पाण्याच्या प्रबळ प्रवाहासमोर टिकू शकला नाही.
पाण्याच्या वेगामुळे तो खोल पाण्यात ओढला गेला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. सुमारे दोन तासांच्या अथक शोधानंतर अखेर वैभवचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये हळहळ आणि दुःखाचे वातावरण होते.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मृत वैभव बांदेकर यांच्या पश्चात आई-वडील व चुलत बहिणी असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Subscribe










