३५ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

मालवण मेढा येथील दुर्दैवी घटना

मालवण : मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय-३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सर्वेश याच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेढा येथील सर्वेश पराडकर हा काल सोमवारी २० एप्रिल रोजी सायंकाळी बाहेरून घरी आल्यावर घरातील आपल्या खोलीत गेला होता. रात्री त्याचे वडील त्याला जेवणासाठी बोलवायला गेले असता प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता सर्वेश हा खोलीतील पंख्याला दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत मालवण पोलीसांना माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर सर्वेश याचा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. आज मंगळवारी सकाळी शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रकरणी सर्वेश याचे वडील संतोष भास्कर पराडकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सर्वेश हा सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी सेवा तसेच वॉटरस्पोर्ट्स मध्ये कार्यरत होता. मालवण मधील एक उत्तम क्रिकेटपटू व बेंजो वादक म्हणूनही त्याची ओळख होती. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. त्याच्या आकस्मिक निधनाने मालवणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी, चुलत बहीण असा परिवार आहे.

error: Content is protected !!