
१४ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने शुक्रवारी रात्री मोठी धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट आदेशाने राबविलेल्या या मोहिमेत १४ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या असून तोंडवली येथील वाळू उपशाचे रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांची रात्री २ वाजता ‘फील्ड’वर भेट
या कारवाईचे गांभीर्य इतके होते की, स्वतः जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मध्यरात्री दोन वाजता झाराप येथील तपासणी नाक्याला प्रत्यक्ष भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. खुद्द जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरल्याने महसूल यंत्रणेने अत्यंत वेगाने चक्रे फिरवली. या संयुक्त कारवाईत देवगड व दोडामार्ग वगळता जिल्ह्यातील इतर सहा तहसीलदारांचा सहभाग होता.
कुडाळ – मालवण भागातून सर्वाधिक ९ गाड्या महसूल विभागाने ताब्यात घेतल्या. हा पट्टा वाळू वाहतुकीचे केंद्र मानला जात असल्याने येथे मोठी कारवाई करण्यात आली, वेंगुर्ला तालुक्यात ३ गाड्यांवर कारवाई करण्यात आली, वैभववाडी येथे २ गाड्या अवैध वाळू वाहतूक करताना पकडल्या गेल्या. तोडवलीतील अनधिकृत वाळू उपशासाठी तयार करण्यात आलेले रॅम्प (Ramps) जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या बेदकार वेगामुळे नागरिक त्रस्त होते. विशेषतः आठवडा बाजाराच्या गर्दीत या गाड्यांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वीच कारवाई दरम्यान कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या गाडीला अपघात झाला होता, ज्यात त्या थोडक्यात बचावल्या. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेत ही मोहीम हाती घेतली. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.


Subscribe










