कुडाळ पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक हवालदार शामसुंदर भगत यांचा प्रामाणिकपणा

रस्त्यावर सापडलेली ५०००/- रुपयांची रोख रक्कम केली मूळ मालकाला परत

कुडाळ : महाराष्ट्र पोलीस आपले कर्तव्य नेहमी प्रामाणिकपणे बजावत असतात. म्हणूनच सर्वसामान्य माणूस आपले आयुष्य शांततेत जगू शकतो. आज कुडाळ येथे घडलेल्या घटनेमुळे यावर शिक्कामोर्तब झाले.

त्याचे झाले असे की, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावचे रहिवासी संजय वाळके कुडाळ येथे काही कामानिमित्त आले होते. यावेळी ते कुडाळ पोस्ट ऑफिस परिसरात आले असता त्यांच्या ताब्यातील ५ हजारांची रोख रक्कम गहाळ झाली. कुडाळ पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक हवालदार शामसुंदर भगत त्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना ही रोख रक्कम त्यांना सापडली. त्यांनी ही रोख रक्कम स्वतःजवळ सांभाळून ठेवली.

काही वेळाने आपली रोख रक्कम गहाळ झाल्याचे वाळके यांच्या लक्षात आले. याबाबत पोस्ट ऑफिस परिसरातील लोकांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित रक्कम कुडाळ पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक हवालदार शामसुंदर भगत यांच्याकडे असल्याचे त्यांना सांगितले.

याबाबत वाळके यांनी भगत यांना विचारले असता भगत यांनी खात्री करून घेत संजय वाळके यांना संबंधित रोख रक्कम परत केली. आपली रोख रक्कम परत मिळताच वाळके यांच्या चेहेऱ्यावर समाधान फुलले. त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक हवालदार शामसुंदर भगत यांचे आभार मानले.

error: Content is protected !!