नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत धडक भेट

रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या अन् थेट मंत्र्यांनाच केला फोन

मदत लागल्यास अवश्य कळवा ; मात्र चांगल्या सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नका असा इशाराही दिला

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालय कणकवली ला अचानक भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील स्वच्छता, वीज व्यवस्था, पाणीपुरवठा, आवश्यक साधनसामग्रीचा अभाव, अपुरी वैद्यकीय यंत्रणा, काही डॉक्टरांचा बेजबाबदारपणा तसेच वेळेत हजर नसणारे डॉक्टर याबाबत संताप व्यक्त करत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रुग्णालयातील वास्तव स्थितीची सविस्तर माहिती दिली. रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

भेटीदरम्यान अनेक रुग्ण व नातेवाईकांनी काही डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचे कौतुकही केले. विशेषतः डॉक्टर विशाल रेड्डी, डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर माधव उबाळे, डॉक्टर धनंजय रासम आणि डॉक्टर सर्व्हेश तायशेट्ये यांच्या कामाची प्रशंसा करत अशा डॉक्टरांमुळेच रुग्णालयावर विश्वास टिकून आहे, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर विशाल रेड्डी यांची करण्यात आलेली बदली हा मुद्दा यावेळी सर्वाधिक चर्चेत राहिला. डॉक्टर विशाल रेड्डी यांनी कणकवलीत अत्यंत प्रामाणिकपणे व दर्जेदार सेवा दिल्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली. बदलीमुळे रुग्णांमध्ये तीव्र नाराजी असून जर बदली तात्काळ रद्द झाली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल; त्या वेळी रुग्ण व नातेवाईक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला. या गंभीर बाबीची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तत्काळ मंत्री प्रकाश आबिटकर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांना दिली.

रुग्णालयात दर्जेदार व आधुनिक मशिनरी उपलब्ध असूनही ती वापरण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याचेही यावेळी उघड झाले. टू डी इकोसारख्या तपासण्यांसाठी रुग्णांना खासगी ठिकाणी जाऊन अडीच ते तीन हजार रुपये खर्च करावा लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. ही सुविधा उपजिल्हा रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी नगराध्यक्ष पारकर यांच्याकडे केली.

या सर्व पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी वैद्यकीय प्रभारी अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील यांच्याशी चर्चा करत रुग्णालयातील उणिवा तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णांना चांगली व वेळेवर सेवा मिळणे अत्यावश्यक आहे. गरज भासल्यास आवश्यक ती मदत आम्ही करू; मात्र चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नयेत. रुग्ण अशा डॉक्टरांवर विश्वास ठेवून येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे सुधारलेली आरोग्य यंत्रणा पुन्हा विस्कळीत होऊ देऊ नका, असेही श्री. पारकर म्हणाले. तसेच या सर्व प्रश्नांबाबत वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वासही श्री. पारकर यांनी दिला.

भेटीदरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी रुग्णालयातील विविध विभागांची सखोल पाहणी केली. प्रत्येक रुग्णाजवळ जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या. या धडक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात हालचाल सुरू झाली असून नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!