
कुडाळ येथे झाला होता अपघात
डोक्याला झाली होती गंभीर दुखापत
कुडाळ : कुडाळ येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे आंबडपाल गावासह कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुंडलिक नाईक (रा. आंबडपाल) हे आपल्या ताब्यातील दुचाकीने कुडाळ येथून आंबडपाल येथील घरी जात होते. कृष्णाई सुपर मार्ट येथे आले असता त्यांच्या पुढे चालत असलेल्या बोलेरो पिकपला त्यांची जोरदार धडक बसली. या धडकेचा आवाज एवढा भीषण होता की आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. यावेळी शिवसेना तालुका संघटक रोहित भोगटे प्रसंगावधान राखत १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. यानंतर उपस्थितांच्या सहाय्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुंडलिक नाईक यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या या निधनाने नाईक कुटुंबीयांसह आंबडपाल गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


Subscribe










