जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वालावल राऊळवाडी, चेंदवण ठुमरेवाडी, कवठी बंदरवाडी येथे होणारे अनधिकृत माती उत्खनन थांबवून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कुडाळ तालुक्यातील वालावल राऊळवाडी चेंदवण ठुमरेवाडी कवठी बंदरवाडी ही तिन्ही गावे खाडी किनाऱ्यालगत असून या गावातील काही आसामी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत माती उत्खनन करून बाहेर मातीची विक्री केली जात आहे. यावर महसूल प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे.अशीच परिस्थिती चालू राहिली तर वालावल,चेंदवन,कवठी ही तिन्ही गावे “माळीण” गावासारखी गडप होऊ शकतात त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तरी वालावल चेंदवन,कवठी या तिन्ही गावातील अनधिकृत माती उत्खनन व विक्री तात्काळ थांबून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सुपूर्त केले आहे.