युवकाचा जागीच मृत्यू
मालवण : कसाल महामार्गावरील सावरवाड चेक पोस्टनजिकच्या वळणावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ओंकार चव्हाण या फोंडाघाट येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फोंडाघाट आणि हरकुळ परिसरातील ४ ते ५ युवकांचा ग्रुप आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून मालवण येथे पर्यटनासाठी आला होता. मालवण फिरून परतत असताना सावरवाड चेक पोस्टनजीक आपल्याच सहकाऱ्याच्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची यामाहा स्पोर्ट्स बाईक समोरून येणाऱ्या लातूर पासिंगच्या स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडकली.
ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये ओंकार चव्हाण याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील दुसरा युवक सुदेश सापळे (रा. फोंडाघाट) हा किरकोळ जखमी झाला असून कार चालकाला देखील दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. मालवण फिरून आनंदाने घरी परतणाऱ्या या मित्रमंडळींवर काळाने झडप घातल्याने फोंडाघाट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Subscribe










