कुडाळात डंपरचा थरार

ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न

कुडाळ : कुडाळ शहरात बुधवारी आठवडा बाजाराच्या गर्दीत एका भरधाव वाळू डंपरने अक्षरशः थरार निर्माण केला. या डंपरने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक आणि त्यांच्या मुलाच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुडाळमध्ये बेकायदा वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात राजन नाईक आपल्या मुलासह रस्त्यालगत उभे होते. यावेळी बाव-कुडाळ मार्गावरून एक वाळू वाहतूक करणारा डंपर अत्यंत भरधाव वेगाने आला त्याच स्थितीत त्याने डंपर थेट नाईक यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच आरडाओरडा केल्याने दोघेही यातून थोडक्यात बचावले.

पाठलाग करून डंपर पकडला

अपघाताचा प्रयत्न करून डंपर चालक न थांबता पंचायत समितीच्या दिशेने वेगाने पळून जात होता. यावेळी राजन नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने मोटारसायकलवरून डंपरचा पाठलाग केला. अखेर गुलमोहर हॉल मार्गावर मोटारसायकल आडवी लावून डंपर रोखण्यात आला. यावेळी नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत चालकाला जाब विचारला आणि तातडीने प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिसांना पाचारण केले.

महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह !

सध्या वाळू उपसा अधिकृतपणे बंद असतानाही दिवसाढवळ्या भर वस्तीतून वाळूचे डंपर सुसाट कसे धावतात? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. “एकिकडे वाळू उपसा बंद असल्याचे सांगितले जाते, मात्र दुसरीकडे शहरात डंपरचा उच्छाद सुरू आहे. या बेकायदा वाहतुकीमुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे. महसूल प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे का?” असा सवाल राजन नाईक यांनी उपस्थित केला आहे.

सध्या संबंधित डंपर कुडाळ पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणातील दोषींवर आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

error: Content is protected !!