रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क, आरोग्य अन् दळणवळण व्यवस्थेसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
गणरायाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज होत असताना लाखो चाकरमानी आणि पर्यटकांच्या स्वागताची जबाबदारीही प्रशासनावर आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, रस्ते, वीज, दूरसंचार, आरोग्य व्यवस्था आणि एसटी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना वेळीच करा असे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या विशेष आढावा बैठकीत जिल्ह्यातील रस्ते, वीज, दूरसंचार, आरोग्य व्यवस्था आणि एसटी वाहतूक यांचा आढावा घेण्यात आला. ५ सप्टेंबरपर्यंत देखभाल-दुरुस्तीची बहुतांश कामे पूर्ण करून यंत्रणांनी उत्सवासाठी सज्ज राहावे, अशी स्पष्ट वेळमर्यादाही पालकमंत्र्यांनी दिली. आपण पुढच्या दौऱ्यात आकस्मिक भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, , मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, बांधकाम सभापती संतोष साठवलकर,, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोजरावने, वैभववाडी सभापती बंटी रावराणे, भाजप तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, बुवा संतोष कानडे ,कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल, श्रीमती पूजा इंगवले, अनामिका जाधव, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात येतात. त्यामुळे महामार्गासह जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना करणे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘लाईट आणि नेटवर्क’ बंद पडता कामा नये!
गणेशोत्सवात वाढणारी गर्दी आणि त्यातून वीज व दूरसंचार यंत्रणेवर येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन महावितरण आणि बीएसएनएलने विशेष पूर्वतयारी करावी, असे निर्देश देण्यात आले. वीजपुरवठा खंडित होऊ नये, तसेच मोबाईल व दूरसंचार सेवा सुरळीत राहावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ व तांत्रिक यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता आरोग्य सेवा आणि एसटी वाहतूक व्यवस्थेलाही विशेष प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध होईल, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करण्याचेही सांगण्यात आले.
निधी पडून ठेवू नका; कामे दर्जेदार करा!
विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी संबंधित विभागांकडे वेळेत वर्ग करून कामांना गती द्यावी. स्थानिक प्रशासन आणि कंत्राटदारांमध्ये समन्वय ठेवून कामांचा दर्जा कुठेही कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी ग्रामीण तसेच शहरी भागातील विविध स्थानिक समस्या मांडल्या. या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कामांची प्रत्यक्ष प्रगती तपासण्यासाठी पुढील गुरुवारी पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याने प्रशासनावर या कामाची जबाबदारी निश्चित झाली आहे.


Subscribe










