निसर्ग शाळेच्या उपक्रमातून डुंगोबा देवराईत स्वच्छता अभियान

मालवण शहराबाहेरील किल्ले निवती परिसरात आयोजित निसर्ग शाळेच्या उपक्रमांतर्गत कांदळवन क्षेत्र आणि डुंगोबाची राई देवराई येथे विद्यार्थ्यांनी आणि निसर्गप्रेमींनी एक अनोखा अनुभव घेतला. चैत्रातील उन्हात खास गाडीने निघालेल्या या सहलीत निसर्ग निरीक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

या उपक्रमाची सुरुवात कर्ली खाडी परिसरातून झाली. दुर्गा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तांबड्या चिपीचे झाड, पांढरी चिपी, मिरांडी, करंज वेल, तसेच विविध कांदळवनातील वनस्पतींचे निरीक्षण केले. खाडीतील जैवविविधतेत खेकड्यांची बिळे, गोगलगायीची अंडी आणि नीलपंखी फुलपाखरू यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यानंतर पथक किल्ले निवती किनाऱ्याकडे पोहोचले. येथे सुकाणू (Cerbera odollam), ऑर्किड फुले, अळंबी आणि विविध वृक्षांचे निरीक्षण करण्यात आले. पुढे डुंगोबा देवराईकडे प्रस्थान करताना पारंपरिक गावजीवनाचा अनुभव घेत सहभागी मंडळी डुंगेश्वर परिसरात दाखल झाली.

डुंगोबा देवराई ही स्थानिकांसाठी श्रद्धास्थान असून येथे झाडांची तोड किंवा कोणतीही वस्तू बाहेर नेण्यास मनाई आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली होती. त्यांनी येथे साचलेला प्लास्टिक कचरा पाहून तीव्र उदासीनता व्यक्त केली होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीने गावात येऊन व्यक्त केलेली ही भावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

याच प्रेरणेतून निसर्ग शाळेच्या या उपक्रमात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदार गावडे यांच्या पुढाकाराने सर्व सहभागी कामाला लागले. हॅण्डग्लोज आणि पिशव्यांच्या सहाय्याने अवघ्या अर्ध्या तासात तब्बल १५० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. सहा मोठ्या बॅगमध्ये प्लास्टिक बाटल्या, उदबत्तीच्या पुड्या आणि इतर कचरा जमा करण्यात आला.

यानंतर सुंदरी (Heritiera littoralis) या दुर्मिळ कांदळवृक्षाचे निरीक्षण करण्यात आले. दुर्गा मॅडम यांनी या झाडांचे संवर्धन किती महत्त्वाचे आहे याची माहिती दिली. निवती आणि खवणे परिसरातच आढळणारी ही झाडे वाचवण्यासाठी योग्य वातावरणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

देवराईतील जैवविविधतेचा अभ्यास करताना हुरशी, कापशी, कांदळ यांसारख्या वृक्षांची ओळख झाली. तसेच या भागातील धार्मिक परंपरा, स्थानिक श्रद्धा आणि निसर्गसंवर्धन यांचा परस्पर संबंधही स्पष्ट झाला.

उपक्रमाच्या शेवटी सर्वांनी मिळून डुंगेश्वराचे दर्शन घेतले आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. जमा केलेला कचरा मालवण येथील कचरा डेपोमध्ये संजू यांच्या माध्यमातून जमा करण्यात आला.

या उपक्रमातून “निसर्ग संवर्धन हीच खरी सेवा” हा संदेश देण्यात आला. निसर्ग शाळेच्या या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, स्थानिक स्तरावर एकत्र येऊन बदल घडवता येतो याचे उत्तम उदाहरण या उपक्रमाने घालून दिले.

error: Content is protected !!