ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास
योगिता कानडे/कुडाळ
तालुक्यातील तेर्सेबांबर्डे – मळावाडी येथील हरि सावंत यांच्या बागेतील एका खड्ड्यामध्ये सहा फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही मगर सुरक्षितपणे पकडण्यात यश आले , त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नेमकी घटना काय?
मळावाडी येथील शेतकरी श्री. हरि सावंत यांच्या मालकीची बाग आहे तेथे एका खड्ड्यात काहीतरी हालचाल होत असल्याचे निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिले असता, तिथे सुमारे ६ फूट लांबीची मगर अडकल्याचे दिसून आले. लोकवस्तीजवळच मगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मगरीला कोणतीही इजा न होता तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. ही मगर आता सुरक्षित असून, तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया वनविभागामार्फत केली जाणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे , सरपंच रामचंद्र परब , पोलीस पाटील रमाकांत जाधव , वायरमन देऊ जाधव, हरी सावंत ,संजय जाधव, वामन बांबर्डेकर ,रोशन परब ,संजू देसाई ,कल्पेश सावंत, प्रसाद परब, वनरक्षक प्रसाद पाटील, रेस्क्यू टीम दिवाकर बांबर्डेकर, राहुल कानडे , प्रतिक दळवी, उदय कानडे, अक्षय कानडे, दिनेश कानडे आणि सहकारी तसेच माळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांच्या मदतीने मगरीला सुरक्षित पकडता आले. या भागात मगरींचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.


Subscribe









