सत्तेत राहून प्रशासनाला जाब विचारायला हिंमत लागते; मांडवलीचे राजकारण करणाऱ्यांना लोकहिताची भूमिका काय समजणार?
शिवसेना शाखाप्रमुख राजाराम गडेकर यांचा संतोष शिरसाट यांना घणाघात.
कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका ही पूर्णपणे जनहिताची आहे. सत्तेत असतानाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्यास हिंमत लागते. मात्र, सत्तेत असताना मांडवलीचे राजकारण करणाऱ्यांना अशा लोकहिताच्या भूमिकेचे महत्त्व काय समजणार, असा घणाघाती टोला शिवसेना शाखाप्रमुख राजाराम गडेकर यांनी उबाठा शहरप्रमुख संतोष शिरसाट यांना लगावला आहे.
कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने कुडाळ शहर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर नेऊन खड्ड्यांची परिस्थिती दाखवली. जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनाला जाब विचारणे हे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे कर्तव्यच आहे, असे गडेकर यांनी म्हटले.
“तीन वेळा जनतेने नाकारले, तरीही विकासावर टीका कशासाठी?”
संतोष शिरसाट यांच्यावर निशाणा साधताना गडेकर म्हणाले की, “कुडाळच्या जनतेने तुम्हाला तीन वेळा नाकारले आहे. सध्या तुम्ही कुडाळ नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक आहात. गेल्या पाच वर्षांत नगरपंचायतीच्या सभागृहात शहरातील जनतेच्या प्रश्नावर किती वेळा ठाम भूमिका मांडली, हे आधी जनतेसमोर जाहीर करावे. त्यानंतरच शहराच्या विकासकामांवर आणि शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करावी.”
शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी असो अथवा विरोधक, प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. सत्ता आहे म्हणून प्रशासनाच्या चुकीकडे दुर्लक्ष करायचे, अशी शिवसेनेची भूमिका नाही. नागरिकांना त्रास होत असेल तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची भूमिका आम्ही यापुढेही घेत राहू, असेही गडेकर यांनी स्पष्ट केले.
“वैभव नाईक यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीचा हिशेब आधी द्या”
माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरही गडेकर यांनी जोरदार टीका केली. “संतोष शिरसाट यांनी केवळ माजी आमदार वैभव नाईक यांची बाजू घेण्यापेक्षा त्यांच्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात कुडाळ शहरासाठी नेमकी किती आणि कोणती विकासकामे झाली, याचा हिशेब जनतेसमोर मांडावा. दहा वर्षांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन मतदारांनी निवडणुकीत केले आहे,” असे गडेकर म्हणाले.
तसेच, “माजी आमदारांच्या कार्यकाळात ठेकेदारी आणि त्यातून कोणाला लाभ झाला, याबाबतही अनेक प्रश्न आहेत. संतोष शिरसाट यांनी इतरांवर आरोप करण्यापूर्वी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” असे आव्हानही गडेकर यांनी दिले.
“पदे टिकविण्यापेक्षा जनतेतून निवडून येऊन दाखवा”
“फक्त पक्षातील पदे सांभाळून आणि नेत्यांची बाजू घेऊन जनाधार सिद्ध होत नाही. जनतेचा विश्वास असेल तर तो निवडणुकीच्या मैदानात सिद्ध करावा लागतो. संतोष शिरसाट यांच्यात हिंमत असेल तर आगामी कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत स्वतः उमेदवार म्हणून उभे राहावे आणि थेट जनतेचा कौल घ्यावा,” असे खुले आव्हान राजाराम गडेकर यांनी दिले.


Subscribe









