गळा आवळून डोक्यात कोयत्याने वार
कुडाळ तालुक्यातील कालेली येथील घटना
कुडाळ : कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीनेच पत्नीचा गळा आवळून, तिच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आरोपी रमेश गणपत चव्हाण (वय ५७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैदेही विकास चव्हाण (वय ३२, रा. सांताक्रुझ, मुंबई) या सध्या आपल्या मूळ गावी कालेली येथे आल्या होत्या. दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सासू रेश्मा चव्हाण या घरातील बेडवर पडलेल्या असताना, सासरे रमेश चव्हाण यांनी अचानक संतापाच्या भरात त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
“तू मुलगा आणि सुनेची बाजू घेतेस का? तू त्यांची वकील आहेस का? आता तुला संपवतोच,” अशी धमकी देत आरोपीने रेश्मा चव्हाण यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. जीवाच्या आकांताने त्यांनी स्वतःची सुटका करून घेत न्हाणीघराच्या दिशेने धाव घेतली; मात्र संताप अनावर झालेल्या आरोपीने मागून जात त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती साटम तसेच कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. आर. ए. मगदूम यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
या संदर्भात गुन्हा रजि. नं. ००६६/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२), ३५१(३) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तपासाचे काम पी.एस.आय. श्री. सावर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, ए.पी.आय. श्री. जयदीप पाटील अधिक तपास करत आहेत. आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घराच्या चार भिंतीत घडलेली ही भयावह घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून, नात्यांच्या तुटलेल्या धाग्यांची वेदनादायक आठवण करून देणारी ठरली आहे. या प्रकारामुळे कालेली परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.


Subscribe










