कुडाळ – विजापूर बस सेवा सुरळीत व नियमित करण्यात यावी

समस्त विजापूर प्रवासी व नागरिकांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

कुडाळ : कुडाळ आगाराकडून सुरू असणारी कुडाळ – विजापूर बस सेवा अचानक बंद करण्यात आल्यामुळे गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या कामगारांचे हाल होत आहेत. याबाबत विजापूर प्रवासी व नागरिकांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले. तसेच कुडाळ आगाराकडून सुरू असलेली कुडाळ – विजापूर बससेवा सुरळीत व नियमित सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ आगाराकडून सुरू असणारी कुडाळ ते विजापूर अशी नियमित बस सेवा ऐन गणेश चतुर्थीच्या दिवसांमध्ये बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कुडाळ व परिसरातून विजापूर येथे प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांना तसेच इतर प्रवाशांना आपल्या गावी ये-जा करताना मोठी गैरसोय होत आहे.

गणेश चतुर्थी, दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांच्या काळात अनेक प्रवासी आपल्या कुटुंबीयांसह गावी जाण्यासाठी या बससेवेवर अवलंबून असतात. परंतु, सदर बस सेवा बंद असल्यामुळे त्यांना नाईलाजाने खासगी वाहनांचा किंवा इतर पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

विजापूर येथून कुडाळ व परिसरात येऊन स्थायिक झालेले अनेक नागरिक हे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे खासगी वाहनांचा अतिरिक्त खर्च करणे प्रत्येक प्रवाशाला शक्य होत नाही. अशा परिस्थितीत एस.टी. महामंडळाची बस सेवा ही प्रवाशांसाठी सुरक्षित, सोयीस्कर व परवडणारी वाहतूक व्यवस्था ठरते. विशेषतः सणासुदीच्या काळात तसेच आपत्कालीन परिस्थितीत ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरते.

कुडाळ ते विजापूर मार्गावर दिवसातून दोन बसफेऱ्या एक सकाळी व एक संध्याकाळी अशा स्वरूपात सेवा सुरू होती. तरी सदर बससेवा पूर्णपणे बंद न करता, निदान दररोज संध्याकाळची एक बसफेरी तरी नियमित वेळेत सुरू ठेवण्यात यावी. अशी मागणी विजापूर प्रवाशांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे सुपूर्त केले.

यावेळी निगप्पा कोळी, नबिसाब मल्लि, विजय सिंदगीकर, दाऊद टाळीकोटो, रमेश राठोड, संगू मास्तर, मल्लाप्पा बूटानी, चांद मकादम, सैफान बागवान, शेखर जाधव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!