
गोव्या पेक्षा महाराष्ट्रासाठी मोठी संधी
मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उत्तर गोव्यातील प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डला भेट
सिंधुदुर्गातील जलवाहतुकीला चालना देण्यासह जहाजबांधणी आणि जहाज दुरुस्ती उद्योगाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाव निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी उत्तर गोव्यातील प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डला भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान जहाजबांधणी, दुरुस्ती, डाय डॉक तसेच या क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या विविध रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियेश कामत यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासमोर शिपयार्डमधील कामकाजाचे सादरीकरण केले. परदेशातून आलेल्या जहाजांची सुरू असलेली दुरुस्ती, डाय डॉकची सुविधा, जहाजबांधणीची प्रक्रिया आणि या उद्योगाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याबाबत त्यांनी माहिती दिली.
“जहाजबांधणी उद्योग महाराष्ट्र आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराची मोठी क्रांती घडवू शकतो. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढविणारा हा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतो. गोव्यापेक्षाही या उद्योगासाठी महाराष्ट्राकडे मोठी क्षमता आणि संधी आहे,” असे मत प्रियेश कामत यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्गाला विस्तीर्ण समुद्रकिनारा, बंदरे आणि जलवाहतुकीची मोठी क्षमता लाभली आहे. त्यामुळे जहाजबांधणी व दुरुस्ती उद्योगाला चालना मिळाल्यास स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेलाही बळ मिळू शकते. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
यावेळी प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियेश कामत, प्रशांत देसाई, उद्योजक डॉ. निलेश बाणावलीकर, सूरज देव्हाद्या, बाबू नाईक आणि साईल देसाई उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, संदीप साटम, रुपेश कानडे, डॉक्टर अमोल तेली आधी सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी या दौऱ्यात सहभाग घेत या प्रकल्पाची पाहणी केली.



Subscribe









