अल्पअवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

व्हाट्सअपवरील मेसेजमुळे झाला प्रकार उघड

कुडाळ : तालुक्यातील मोरे, वडाचे टेंब येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विद्यार्थिनी विराणी (वय १६) हिची दहावीची बोर्ड परीक्षा सुरू होती. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ ते ५.३० या वेळेत ती घरात अभ्यास करत असताना ओढणीच्या सहाय्याने घरातील लाकडी बारला गळफास घेतल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले. पंचनामा व आवश्यक कार्यवाही करून रात्री उशिरा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

सुरुवातीला परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी विद्यार्थिनीचा मोबाईल तपासला असता व्हॉट्सअॅपवरील चॅटमधून धक्कादायक बाबी समोर आल्या. “Life Partner” या नावाने सेव्ह केलेल्या क्रमांकावरून ११ वीमध्ये शिकणाऱ्या सुजल राऊळ (वय १७, रा. वाडोस, कोळंबवाडी) याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २० व २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या संभाषणात संबंधित मुलाने संशयाच्या भरात विद्यार्थिनीला शिवीगाळ करत “तू मर” अशा शब्दांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या मानसिक छळामुळेच विराणीने टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा वडिलांनी केला आहे. पोलिसांकडे चॅटचे स्क्रीनशॉट व मोबाईल सुपूर्द करण्यात आले असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे कुडाळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुलामुलींमधील संबंध, सोशल मीडियावरील संवाद आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण याबाबत पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. परीक्षेच्या तणावासोबतच भावनिक दबाव किती घातक ठरू शकतो, याची ही वेदनादायी जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे.

error: Content is protected !!