ऍड. किशोर वरक यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल
कुडाळ : चेंदवण येथील सिद्धीविनायक बिडवलकर खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट याला मोक्का न लावण्यासाठी तसेच त्याचा जामीन करण्यासाठी दहा लाख रु.ची खंडणी मागितली. तसेच त्यापैकी ऍडव्हान्स म्हणून १ लाख रु स्वीकारल्या प्रकरणी अँड. किशोर वरक (रा. खानोली, ता. वेंगुर्ले व सुरेश दुर्गा झोरे (38, रा. हिलोक, ता. कुडाळ) या दोघांवर कुडाळ पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. यातील सुरेश झोरे याला आज सायंकाळी ताब्यात घेत रात्री अटक केली. याबाबतची फिर्याद सिद्धी सिद्धेश शिरसाट (कुडाळ बाजारपेठ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
खंडणीची ही घटना जुलै महिन्याच्या पाहिला आठवडा ते 15 जुलै 2025 या कालावधीत घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, एप्रिल 2025 चे पहिल्या आठवडयात सिद्धी शिरसाट व सिद्धेश शिरसाट घरी असताना पावशी येथील योगेश तुळसकर त्याच्या घरी आले. हिलोंक येथील सुरेश झोरे याचा फोन आला त्याने चेंदवण येथील सिद्धीविनायक बिडवलकर हा बेपत्ता झाल्या बाबतच्या तक्रारीमध्ये सिद्धेश शिरसाट याचा हात असून याबाबत अॅड किशोर वरक हे सिद्धेश शिरसाट याच्या विरुद्ध तक्रार करणार आहेत. त्यात सिद्धेश याला त्रास होणार असल्याने तक्रार करायची नसल्यास अॅड किशोर वरक यांना भेटून प्रकरण मिटवा निरोप असा अॅड वरक यांनी दिल्याचे झोरे याने सांगितले. त्यावेळी सिद्धेश याने सदर प्रकरणाची आपला काही संबंध नसल्याचे सांगितल्याने ते किशोर वरक याला भेटले नाहीत. त्यानंतर सिद्धेश याच्यावर सिद्धीविनायक बिडवलकर यांच्या खून प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सिद्धेश व त्याच्या कामगारांना अटक झाली होती.
सिध्दी शिरसाट यांचे पती सिद्धेश प्रकरणी तुरुंगात असताना जुलै 2025 मध्ये योगेश तुळसकर यांनी सिद्धी यांना फोन करून पती सिद्धेश शिरसाट यांचे विरुद्ध अॅड किशोर वरक सरकारी वकीलांसोबत न्यायालयात काम करणार आहेत. तसेच सिद्धेश याच्यावर मोक्का लावणार आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन होणार नाही, असे सांगुन मोक्का लावायचा नसल्यास 10 लाख रु. द्यावे लागतील, असा अॅड वरक यांचा निरोप त्याचा माणुस सुरेश झोरे याने फोनव्दारे सांगितला असल्याचे सांगितले.
वरक यांचा 10 लाख रुपये मागणीचा निरोप सिध्दी यानी सिद्धेश याला सांगितल्यानंतर त्याने वरक याची भेट घेण्यासाठी ओरोस येथील सिद्धेश याचा मित्र हार्दीक शेगले याला भेटुन त्याची मदत घेण्यास सांगितले.
त्याप्रमाणे शेगले यांना याबाबत सांगितले. त्यानंतर तुळसकर व शेगले यांनी वरक व झोरे या दोघांची 3 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 .45 ते 7 वाजण्याच्या मुदतीत कुडाळ एमआयडीसी येथे भेट घेतली. तेव्हा वरक याने सिद्धेश आला मोक्का लावायचा नसल्यास 10 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर सिद्धी यांनी झोरे यांना फोन केला तेव्हा मोक्का न लावण्यासाठी तसेच जामीन लवकर मिळावा यासाठी 10 लाख रु.ची मागणी केली. तसेच अॅडव्हान्स म्हणून पाच लाख रु.ची मागणी केली अडीच लाख अॅडव्हान्स देणार असल्याचे सांगितले होते. परंतु सिद्धेश याचा जामीन मंजुर झाल्याने सिद्धी यांनी वरक याला त्याने मागणी केलेले पैसे दिले नाहीत. 3 जुलै रोजी शेगले यांनी आपण व तुळसकर यांनी एक लाख अॅडव्हान्स म्हणून वरक याला 3 जुलै रोजी दिल्याचे श्री शेगले यांनी सिध्दी शिरसाट यांना सांगितले. दरम्यान, संशयित किशोर वरक व सुरेश गोरे या दोघांवर पांची भीती दाखवून खंडणी मागितली व ती घेतल्याप्रकरणी भारतीय न्याय सहिता 308 (2), 308 (3),308 (7), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करीत आहेत.


Subscribe









