स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी दाखवली तत्परता
चार मुलींपैकी तिघी सुखरूप, एकीवर उपचार सुरू
मालवण : येथील चिवला बीचवर काल सायंकाळी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या चार शालेय मुली बुडत असताना मोठा अनर्थ टळला. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी तत्परता दाखवत तात्काळ जेटस्कीच्या मदतीने समुद्रात धाव घेऊन या चौघींनाही वाचवले. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खरेदी केलेले ‘स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट’ पालिका कार्यालयात धूळ खात पडून असल्याने दुर्घटना घडण्याची ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे.
बुडणाऱ्या चार मुलींपैकी तिघी सुखरूप आहेत, तर एक मुलगी अत्यवस्थ झाली होती. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली असून, ऐन पर्यटनाच्या हंगामात प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा केवळ ‘देखावा’ असल्याची टीका श्री. जोगी यांनी केली आहे.
किनारपट्टी भागात पर्यटकांची मोठी गर्दी असताना आणि समुद्राच्या पाण्याची खोली न समजल्याने बुडण्याच्या घटना वारंवार घडत असताना प्रशासनाची ही उदासीनता चीड आणणारी आहे. कालच्या घटनेत एक मुलगी पाण्यात ओढली जात असल्याचे पाहून पर्यटकांनी किनाऱ्यावरील महिला किशोरी वेंगुर्लेकर यांना माहिती दिली. त्वरित जेटस्की चालक सुनील खलको आणि किशोर वेंगुर्लेकर यांनी जेटस्की घेऊन समुद्रात धाव घेतली आणि बुडणाऱ्या चारही मुलींना सुखरूप किनाऱ्यावर आणले.
बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेले स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट पालिका कार्यालयात धूळखात ठेवले असल्याची बाब बाबी जोगी यांनी कालच उघडकीस आणली होती. किनारपट्टीवर पर्यटकांचा जीव जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला होता आणि ही घटना घडल्याने त्यांची भीती खरी ठरली. जर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध केलेल्या सुविधेचा उपयोगच करायचा नसेल, तर ती आणून काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित करत श्री. जोगी यांनी प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


Subscribe










