एस.टी. ला बाजू देत असताना झाला अपघात
कणकवली तालुक्यातील घटना
कणकवली : एस.टी. बस ला बाजू देत असताना रस्त्यालगतच्या ग्रीड वरून दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. यात दुचाकीवरील निकीता दिलीप सावंत (वय २८, रा. फोंडाघाट) ही युवती मयत झाली. तर दुचाकीवरील तिचा भाऊ वैभव दिलीप सावंत जखमी झाला आहे. ही घटना १९ ऑक्टोबरला सायंकाळी साडे पाच वाजता तळवडे-आंब्रड मार्गावर कसवण-तळवडे बौद्धवाडी येथे घडली.
शाईन कंपनीची मोटार सायकल घेऊन वैभव आणि त्याची बहिण निकीता हे आंब्रड ते फोंडाघाट असे येत होते. आंब्रड ते कसवण तळवडे-कणकवली या रस्त्यावरून येत असताना कसवण-तळवडे बौद्धवाडी येथील तीव्र उतारावर समोरून येणाऱ्या एस.टी. बसला बाजू देत असताना दुचाकी रस्त्यालगतच्या ग्रीडवरून घसली. त्यानंतर दुचाकीवरील दोघेही रस्त्यालगत कोसळले. यात निकीता हिच्या डोक्याला मार बसला. तर दुचाकीस्वार वैभव हा देखील जखमी झाला. अपघातानंतर एस.टी. चालक आणि वाहक तसेच बसमधील प्रवाशांनी दोन्ही जखमींना बसमध्ये घेऊन आंब्रड येथील डॉ. खटावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी निकीता हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघात प्रकरणी एस.टी. बस चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर (वय ४६, रा. कणकवली) यांनी आज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वार वैभव सावंत याच्यावर हयगयीने दुचाकी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















 
	

 Subscribe
Subscribe









