हुमरसमधून दुचाकी चोरून कोल्हापुरात पलायन
कुडाळ पोलिसांची दमदार कारवाई
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरस येथे पोलिसांच्या गस्ती दरम्यान पकडण्यात आलेल्या दोन तरुणांसोबत पळून गेलेला मुख्य संशयित अखेर कोल्हापुरात सापडला आहे. अक्षय राजू शेलार (वय २५, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे या सराईत चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडे हुमरस येथून चोरीस गेलेली अॅक्टिवा दुचाकी मिळाली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील असा की, ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास सावंतवाडी पोलिस पथक हुमरस परिसरात गस्त घालत असताना अॅक्टिवा दुचाकीवरून तिघे तरुण ट्रिपलसीट जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी थांबण्याचा इशारा दिल्यावर हे तिघे दुचाकीसह पळून गेले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून तेलीवाडी येथे दुचाकी पकडली. या वेळी गंगाराम शंकर कांबळे (रा. गारगोटी, भुदरगड) याला ताब्यात घेण्यात आले, तर त्याचे दोन साथीदार पसार झाले. दुसऱ्या दिवशी नितीन सुखदेव कांबळे (रा. गारगोटी, भुदरगड) याला सावंतवाडी रेल्वेस्थानक परिसरातून पोलिसांनी पकडले.
दुचाकीची तपासणी केली असता पोलिसांना त्यात एअर पिस्टल गन (एअरगन), कोयता आणि पाना आढळून आला. त्यामुळे हे तिघे दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पळून गेलेल्या तिसऱ्या संशयिताबाबत त्याच्या साथीदारांनी “भांड्या” असे नाव सांगितले होते. त्याचा शोध पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर गुन्हा अन्वेषण शाखेने चोरीच्या गुन्ह्यात अक्षय शेलारला अटक केली. त्याच्याकडे हुमरस येथून चोरीस गेलेली अॅक्टिवा दुचाकी सापडल्याने कुडाळ पोलिसांना या प्रकरणाचा धागा मिळाला. त्यानंतर हवालदार अनिल पाटील आणि रुपेश गुरव यांनी पेठवडगाव न्यायालयाच्या परवानगीने शेलारला ताब्यात घेत कुडाळ येथे आणले. शुक्रवारी त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता केली.
यानंतर कुडाळ पोलिस पथकाने त्याला पुन्हा कोल्हापूर न्यायालयाच्या ताब्यात देण्यासाठी रवाना झाले. तपासात अक्षय शेलार हा सराईत चोरटा असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या उद्देशानेच त्याने आपल्या दोन साथीदारांसह सिंधुदुर्गात प्रवेश केल्याचा पोलिसांना संशय आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









