जानवली येथील अपघातामध्ये शिक्षकाचा मृत्यू

रस्त्यालगत उभ्या असलेल्‍या शिक्षकाला बसली कारची धडक

कणकवली‌ : महामार्गावरील जानवली येथील हॉटेल निलम्स कंट्रीसाईड पासून काही अंतरावर महामार्गालगत उभे असलेले शिक्षक विठ्ठल भिकाजी ढवण यांना भरधाव कारची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्‍यू झाला. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये बैठक आटोपून येणाऱ्या चार महिला देखील जखमी झाल्‍या आहेत.

जानवली गावातील एका घरात बैठकीचा कार्यक्रम होता. त्‍यासाठी लगतच्या गावातील महिला मोठ्या संख्येने आल्‍या होत्‍या. सकाळी साडे दहा वाजता बैठकीचा कार्यक्रम संपला. त्‍यानंतर सुमारे दहा ते बारा महिला ह्या महामार्ग ओलांडून येत होत्‍या. सकाळी १०.४५ च्या सुमारास या महिलांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा अंदाज आला नाही. तर कार चालकालाही आपल्‍या वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. महामार्ग ओलांडणाऱ्या महिलंना वाचविण्यासाठी कार चालकाने महामार्गाच्या बाजूने कार पुढे नेण्याचा प्रयत्‍न केला. यात महामार्गालगत उभे असलेल्‍या विठ्ठल ढवण (वय ४८, रा.साकेडी – वरचीवाडी) यांना कारची जोरदार धडक बसली. यात ते दहा ते पंधरा फुट समोर फेकले गेले. या अपघातात त्‍यांच्या डोक्‍याला मोठी जखम झाल्‍याने, त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

दरम्‍यान या कारची महामार्ग ओलांडणाऱ्या चार महिलांनाही धडक बसली. यामध्ये मीनल मनोहर गवस (वय ६३), शुभांगी शशिकांत गवस (वय ५३, रा.जानवली), सुहासिनी चंद्रकांत दळवी (वय ६५, जानवली) आणि विजया विजय जाधव (वय ४०, रा.फणसवाडी) या जखमी झाल्‍या आहेत. या जखमींना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी कार चालक महेंद्र दिलीप पाटील (वय ४४, रा. डोंबिवली) याच्यावर हयगयीने वाहन चालवून एकाच्या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍या प्रकरणी कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!