संविधानिक हितकारिणी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदुर्ग : साळगाव (ता. कुडाळ) येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांच्यावर जातीय शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी संविधानिक हितकारिणी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सदर घटना अत्यंत गंभीर असून सार्वजनिक पदावर कार्य केलेल्या व्यक्तीकडून अशी जातीय वागणूक होणे हा समाजासाठी धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे कायद्याच्या अधीन राहून तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महासंघाने पुढे नमूद केले आहे की, अलीकडच्या काळात काही राजकीय प्रतिनिधींकडून अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोगाचा मुद्दा पुढे करून मागासवर्गीय समाजाविरुद्ध नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे. यामुळे समाजात जातीय तणाव वाढण्याची शक्यता असून अशा प्रकारची विधाने आणि हालचालींना आळा घालणे आवश्यक असल्याचे महासंघाने म्हटले आहे.
या घटनेचा निषेध करत महासंघाने अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याची मागणीही केली आहे.
यावेळी महेश परुळेकर (जिल्हाध्यक्ष, संविधानिक हितकारिणी महासंघ), गौतम खुडकर (महासचिव), विनोद कदम (निमंत्रक), सुशील कदम (उपाध्यक्ष) आणि किरण जाधव (निमंत्रक) उपस्थित होते.














 
	

 Subscribe
Subscribe









