वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गव्हाणवाडी येथील रहिवासी प्रशांत गुरुनाथ दाभोलकर (वय ३२) यांचा शुक्रवारी रात्री दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेळपी रस्त्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला आणि यात प्रशांत यांचा जागीच प्राण गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत आपल्या दुचाकीने जात असताना रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडाला (निस) जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की, प्रशांत दुचाकीवरून खाली फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
धडकेची तीव्रता इतकी जास्त होती की, रस्त्याचा तो दगडही निखळून पडला आणि गाडी रस्त्याच्या कडेला पडली. शांत आणि मेहनती स्वभाव असलेल्या प्रशांतच्या अकाली निधनाने परुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, काका, काकी आणि भाऊ असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निवती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.