दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
कुडाळ : मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गणेश चंद्रकांत घोगळे (वय २८, रा. वराड हडपीवाडी, ता. मालवण) या मोटरसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल महामार्गावरील रानबांबुळी येथे घडला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक बनले. ट्रॅव्हल्स मालकाकडून नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह जाग्यावरून हटवणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. अखेर सायंकाळी उशिरा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वराड गावचा गणेश घोगळे हा युवक पडवे येथे कामाला होता. दुपारी तो आपल्या दुचाकीवरून घरी येत असताना रानबांबुळी येथील वळणावर त्याचा अपघात झाला. याचवेळी मालवण येथून मुंबईकडे जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्सचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक आक्रमक झाले. जोपर्यंत ट्रॅव्हल्स मालकाकडून नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह जाग्यावरून न हटवण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला. त्यामुळे घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. काही वेळानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. सायंकाळी उशिरा तोडगा निघाल्यानंतर हा मृतदेह ओरोस जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.













