घराच्या पडवीत चक्क आढळला सांगाडा !

सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील घटना

पोलीस घटनास्थळी दाखल

सावंतवाडी : नेमळे-फौजदारवाडी येथे घराच्या पडवीत सांगाडा आढळून आला आहे. अर्जुन बाळा राऊळ (वय ५१) असे संबंधित मृताचे नाव आहे. आजारपणामुळे त्यांचा महिनाभरापूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पडवीत असलेली हाडे प्राण्यांनी खाऊन विखरून टाकली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती सखाराम दशरथ परब (वय ३२) यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. सखाराम परब हे मयत अर्जुन राऊळ यांचे भाचे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन राऊळ हे अविवाहित होते आणि गेल्या ३५ वर्षांपासून ते आपल्या मूळ घरात राहत नव्हते. बाहेरगावी जाऊन भेळ विकणे, प्लास्टिक बाटल्या गोळा करणे अशी कामे करून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. सुमारे ८-९ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या गावात एक लहान कौलारू घर बांधले होते, जिथे ते क्वचितच येत असत. गेल्या एक वर्षापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अंदाजे एक महिन्यापूर्वी त्यांचा आजारपणामुळे त्यांच्या घराच्या पडवीतच मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे मांस कुत्र्यांनी व इतर प्राण्यांनी खाऊन टाकले आणि त्यांची हाडे परिसरात विखुरली असावीत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आणि पोलीस हवालदार मनोज राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करत आहेत.

error: Content is protected !!