नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतला १ कोटी १० लाखांचा निधी वितरित
आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची विकासाची ट्रेन धावणार सुसाट
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महत्त्वाकांक्षी विकासकामांसाठी नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी शासन स्तरावर केलेल्या अथक पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे नगरविकास विभागाकडून मंजूर असलेला आणि गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला सुमारे १.१० कोटी रुपयांचा निधी कुडाळ नगरपंचायतीस वितरीत करण्यात आला आहे. या निधीमुळे मागील दोन वर्षांपासून ठप्प असलेल्या विकासकामांना आता नव्याने गती मिळणार आहे, ज्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
सन २०२१-२२ मध्ये नगरविकास विभागाने नवीन नगरपंचायतींना सहाय्य अनुदान अंतर्गत कुडाळसाठी एकूण ४.०५ कोटी रुपयांची (४ कामांसाठी २.०० कोटी आणि ५ कामांसाठी २.०५ कोटी) विकासकामे मंजूर केली होती. दुर्दैवाने, मागील तीन वर्षांत यापैकी केवळ २८.०० लाख रुपये (९.५० लक्ष आणि १८.५० लक्ष) शासनाकडून वितरीत झाले होते, ज्यामुळे अनेक महत्त्वाची कामे रखडली होती आणि नागरिकांना सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागत होती.
सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आश्वासक पाऊले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी शासन, मंत्रालय, वरिष्ठ कार्यालये आणि कुडाळ नगरपंचायत प्रशासन यांच्यात एक प्रभावी राजकीय दुवा साधला. या माध्यमातून त्यांनी विकासकामांसाठी सातत्याने सकारात्मक प्रयत्न आणि पाठपुरावा केला.
या संदर्भात, नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सन्माननीय श्री. निलेशजी राणे, आमदार कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ यांच्याकडे पत्रव्यवहार करून, शासनाकडून मंजूर असूनही मागील तीन वर्षांपासून वितरीत न झालेल्या निधीच्या मागणीकडे विशेष लक्ष वेधले होते. अखेर, त्यांच्या या प्रयत्नांना आणि आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
नगरविकास मंत्रालयाकडून प्रलंबित असलेला सुमारे १.१० कोटी रुपयांचा निधी आता कुडाळ नगरपंचायतीस वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित निधी मागणी प्रस्ताव देखील लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीकडून देण्यात आली आहे.
या नव्याने वितरीत झालेल्या निधीमधून प्रामुख्याने भंगसाळ गणेश घाट सुशोभिकरण, जिजामाता चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत मुख्य गटार आणि स्ट्रीट लाईट यांसारखी महत्त्वाची विकासकामे पूर्णत्वास येणार आहेत. यामुळे मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांना आता वेग येणार असून, कुडाळ नगरपंचायतीची महत्त्वाकांक्षी विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.