.शेखर सातोस्कर फोटोग्राफी यांचे आयोजन
कुडाळ : शेखर सातोस्कर फोटोग्राफी आयोजित व चिमणी पाखर डान्स अकॅडमी प्रस्तुत किड्स मॉडेलिंग फॅशन शो रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे संपन्न झाला. या शोमध्ये अनेक बालकलाकारांनी आपली कला सादर केली. एवढ्या कमी वयात मुलांमध्ये एवढी प्रतिभा पाहून सगळेच जण थक्क झाले.
या फॅशन शोच्या पहिल्याच फेरीमध्ये मुलांनी मराठी, बंगाली, गुजराती, दक्षिणात्य अशा अनेक वेशभूषा रंगवल्या होत्या. जणू अवघा भारत देशच चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या मंचावर अवतरल्याचा भास यावेळी झाला.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या फेरीत स्पर्धकांनी भारतातील महनीय व्यक्तींच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. यामध्ये महाराणी येसूबाई, ताराराणी, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, संत मीराबाई यांच्या व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरल्या. यावेळी एका स्पर्धकाने साकारलेली दशावतार नाटकातील राजाची वेशभूषा इतरांपेक्षा वेगळी ठरली. यावेळी चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी कोकणची संस्कृती अर्थात दशावतार कलाकारांचे मुक्तकंठाने कौतुक केले. कोरिओग्राफी करणे, नृत्य सादर करणे, प्रॅक्टिस करून नंतर अभिनय सादर करणे सोपे असते. परंतु कोणत्याही प्रकारची तालिम न करता केवळ नाटकाच्या आशयावरून योग्य वेळी योग्य संवादफेक करणे, आवाजातील चढ – उतार, दोन कलाकारांमध्ये असणारा ताळमेळ ही काही सोपी गोष्ट नाही. हीच गोष्ट कोकणातील दशावतारांना महान कलाकार बनवते असे त्यांनी यावेळी म्हटले.
यानंतर एका मुलीने सादर केलेली शिवगर्जना ऐकून सर्वांच्या अंगावर शहारे आले. यावेळी सगळेजण खुर्चीवरून उठून उभे राहिले. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या फेरीमध्ये सर्वांनी एकत्रपणे सादरीकरण केले. एवढ्या कमी वयात मुलांनी सादर केलेले सादरीकरण पाहून सगळेच मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निलेश गुरव यांनी सर्व बालकलाकारांचे कौतुक केले. तसेच भविष्यात हे कलाकार फार मोठे कलाकार म्हणून उदयास येतील असे श्री. गुरव यांनी म्हटले. या कार्यक्रमाला अभिनेते तथा निवेदक श्री. निलेश गुरव प्रमुख अतिथी म्हणून लाभले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी केले.