चराठा येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी : चराठा-नमसवाडी येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारिवडे-डंगवाडी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे त्याचे नाव आह. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चराठे-ओटवणे रस्त्यावर घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, परशुराम पोखरे हा म्हापसा येथील एका कंपनीत नोकरी करत होता आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे तो काही कामानिमित्त बाहेर आला होता. चराठा येथे चिकन घेऊन तो आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. चराठे-ओटवणे रस्त्यावरील ग्रामपंचायतीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या नमसवाडी येथील चढावावर त्याच्या दुचाकीचा ताबा सुटला आणि ती बाजूच्या दगडाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की परशुराम गाडीवरून उडून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अपघाताची माहिती मिळताच चराठा ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी परशुरामला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

error: Content is protected !!